Saturday, June 23, 2012

नायगरा



मी टिपलंय त्याला माझ्या अचंबित नजरेतून 
अन हातातल्या कॅमेऱ्यातून 
पण तो टिपताच येत नाही मला 
माझ्या शब्दातून 
प्रचंड, भव्य, सुंदर या शब्दात तो सामावत नाही 
अन विस्फारलेल्या डोळ्यांच्या कक्षेत तो मावत नाही 
अर्धचंद्राकार कोसळत असलेल्या अनेक धारा 
जलराशीचा तो पसारा कुठे लोपत असेल सारा ?
त्याचे टपोरे लखलखीत थेंब
जणू चमचमत्या हिऱ्यांची उधळण 
उसळत्या तुषारांची अंगभर शिंपण 
भुरभुरणाऱ्या जलतुषारातून शुभ्र तलम धुक्याचा आभास 
जलराशीचे हे नवेच आविष्कार सुखावून जाती मनास 
नायगरा, हा तुझा बेधुंद बेभान
अन भव्य असीम विस्तार
थक्क मी पाहते हे जलवैभव अपार




Sunday, June 17, 2012

मी पाहिले लास वेगास...

मी पाहिले लास वेगास, तरुणाईच्या मुक्त आवेगास ! 
उपभोगाची ही दुनिया खरीच मायानगरी 
मदिरेची अन मदिराक्षीची नशाच येथे खरी
पैशांचा खणखणाट येथे, यंत्रातुन जणु पाउस पडतो
कुणी हारती कुणी जिंकती. कुणी न येथे हिशोब ठेवितो
उघड्यावरती आहे येथे, उघड्या देहाचा व्यापार
नीति अन संस्कृतिचा येथे, नव्यानेच हो आविष्कार
झगमगाटाची ही दुनिया, लक्ष  लक्ष हे इथे दिवे
मुक्त मनाच्या तरुणाईला, मिळते जे जे हवे हवे
धुंद मनाने मुक्त हि फिरते अशी येथली ही गर्दी
तटस्थ ह्यातील फक्त एक मी, बाकी सारे हे दर्दी !