Tuesday, July 24, 2012

निरोप घेताना


 सातासमुद्रापल्याड बाळा गेलास तू दूर 
आठवणीने तुझ्या रे जिवा लागे हुरहूर 
आणलेस आम्हा येथ ,अमेरिका पाह्ण्यास 
माझ्या रे तू श्रावणबाळा ,किती  जपले आम्हास 
अमेरिका देश सारा आहे,भव्य नि प्रचंड 
दाखविण्या सारे आम्हा कष्टलास तू उदंड 
आमुच्या त्या काळी होते जग फार मर्यादित 
तुझ्या दृष्टीने पाहता ,किती झाले विस्तारित 
श्रमलात तुम्ही दोघे केले आमचे कौतुक 
अशी सुना मुले ही मिळता,झाले आमुचे सार्थक 
पाहता हे सारे काही फिटे डोळ्यांचे पारणे 
पंखभरारी तुमची ही,मिळे आम्हाला पाहणे 
केले ज्ञानार्जन तुम्ही,मिळो यश आणि कीर्ती 
देवो ईश्वर तुम्हाला, सदा सुख आणि शांती 
-आई बाबा 



Sunday, July 1, 2012

हॉलीवूड- एक मायानगरी



नाही  खऱ्याची दुनिया ही तर 
नाही खऱ्याची दुनिया 
खोटे येथे खरेच भासते
ही तर इथली किमया  
रस्त्याच्या हलत्या पडद्याने 
प्रवास मोठा घडतो 
हुकुमी इथला पाऊस हा तर 
सरसर झरझर पडतो 
पाण्याचे ते लोट वाहती 
जणू लाटा  उसळत येती 
क्षणात भरती क्षणात ओहोटी 
उगाच वाटे भीती 
मोडतोड गाड्यांची आधी 
अपघातहि घडतो नंतर 
तयार पडझड घरदाराची 
भूकंपही घडतो नंतर 
लुटूपुटीच्या जखमा इथल्या 
रक्तपात हो खोटा 
जखमा नसूनही नायक आपुला 
अभिनय करतो मोठा 
मजेशीर मुखवटे घालुनि 
पात्रे येथे फिरती 
त्यांच्यासंगे फोटो घेण्या 
सारेही धावती 
कल्पनेतले विश्व सजविण्या
केले सारे खास 
खोटे आम्हा खरे वाटण्या
केला हा आभास